संत तुकारामांचे साहित्य | Sant tukaram work
संत तुकाराम गाथा म्हणजे ज्ञानगंगा आहे. तुकाराम गाथेचं अध्ययन करणाऱ्या प्रत्येकालाचं तिनं अक्षरशः झपाटून टाकलंय. जीवनाचं थोर तत्वज्ञान आणि वेदांत इतक्या सोप्या आणि रसाळ भाषेंत इतर कुणीही समजावून देऊ शकत नाही आणि यामुळेच संत तुकारामांना जगतगुरु किंवा भागवत धर्माचा कळस हि उपाधी अत्यंत सार्थ ठरते.
शुद्धबीजा पोटीं । फळें रसाळ गोमटीं ॥१॥
मुखीं अमृताची वाणी । देह वेचावा कारणीं ॥ध्रु.॥
सर्वांगीं निर्मळ । चित्त जैसें गंगाजळ ॥२॥
तुका म्हणे जाती । ताप दर्शनें विश्रांती ॥३॥
– श्री संत तुकाराम
सुंदर तें ध्यान उभे विटेवरी । कर कटावरी ठेवूनियां ॥१॥
तुळसीचे हार गळां कासे पीतांबर । आवडे निरंतर तें चि रूप ॥ध्रु.॥
मकरकुंडलें तळपती श्रवणीं । कंठीं कौस्तुभमणि विराजित ॥२॥
तुका म्हणे माझें हें चि सर्व सुख । पाहीन श्रीमुख आवडीनें ॥३॥
– श्री संत तुकाराम
चित्त समाधानें । तरी विष वाटे सोनें ॥१॥
बहु खोटा अतिशय । जाणां भले सांगों काय ॥ध्रु.॥
मनाच्या तळमळें । चंदनें ही अंग पोळे ॥२॥
तुका म्हणे दुजा । उपचार पीडा पूजा ॥३॥
– श्री संत तुकाराम